मराठी भाषा वर्ग- अमृता रानडे (२०२१)




अभ्यासक्रम - सहभाग

बालभारती १- २४ मुलं (Easter + Summer batches) 

बालभारती २ - १५ मुलं (Summer batches)

 

या वेळी सगळ्या मुलांनी उत्साहाने जोडाक्षरे शिकायला सुरुवात केली. 

Easter च्या सुट्टीत मुळाक्षरांची ओळख झाली असल्याने आणि एका प्रकारची अक्षरं एका दिवशी शिकल्यामुळे ती जोडून लिहिणे पटकन उमजले. 

तरी सगळी अक्षरं एकत्र आल्यावर काही वेळा उच्चार किंवा लिखाणाचा गोंधळ झाला. 

उदा. र अक्षराची जोडाक्षरे. क्रम, श्रम असं का? श ला तिरकी रेघ का नाही ? ध्रुव का धृव? किंवा पक्का / डब्बा, हे कसं म्हणायचं? पकका / डबबा?

मराठी व्याकरणाची तोंडओळख यावेळी करून देता आली. मोठ्या मुलांना इंग्लिश ग्रॅमरमुळे संकल्पना माहीत होती आणि मराठीतील शब्द नवीन होते तर लहानग्यांची पाटी कोरी होती. 

निबंध, पत्र, गोष्टींतील संवादवाचन वगैरे तर झालचं पण काही गोष्टी आणि कवितासुद्धा उत्स्फूर्तपणे मुलांनी लिहिल्या.  

 

बोलतो मराठी बॅच

काही पालकांच्या विनंती वरुन मराठी ऐकणे आणि बोलणे यावर भर असणारी एक वेगळी बॅच घेतली. 

या बॅचचा उद्देश अक्षरांची ओळख असणाऱ्या मुलांची बोली भाषेवर पकड वाढावी हा होता. 

त्यात असं दिसलं कि मुलांना खूप सांगायचं असतं, मराठी बोलायचं असतं पण शब्दसंग्रह कमी पडतो. तो जातो, ती जाते, ते जातात याचे थोडे घोळ होतात.

मराठी शब्द कानावर पडून मगच ते कसे वापरायचे कळणार त्यामुळे एखादं गाणं / गोष्ट ऐकणे, प्रश्न समजून घेऊन पूर्ण वाक्यात उत्तर देण्याचा सराव आम्ही केला. 

गोष्टींबरोबर नादमय शब्दांची गंमत लहान मुलांना जास्त भावते आणि भाषेची गोडी लावते असं जाणवलं. 

 

संवादाचं महत्व किती आहे हे आपल्या सगळ्यांना जाणवून देणाऱ्या काळात चार खुशालीच्या ओळी आपल्या भाषेत लिहिता-वाचता येणे हे किती दुवे जोडू शकेल, नाही?

दोन महिन्याच्या अंतराने दोनदा वर्ग झाले. या सातत्यामुळे असेल पण यावेळी सगळीच मुले जरा मोकळेपणाने मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागली, ही जमेची बाजू म्हणता येईल. 

मुलांच्या चिकाटीमुळे आणि सर्वांच्या सहभागामुळे ठरवलेला अभ्यासक्रम पूर्ण करता आला. 

आपली भाषा शिकण्याचा जोरदार प्रयत्न करणाऱ्या या सगळ्या मुलांचे कौतुक आणि पालकांचे आभार !

 

- अमृता रानडे