युगे अठ्ठावीस ! (भाग १)


"माझ्या कंपनीनी मला हाँगकाँगला हेड ऑफिस मध्ये बोलावलं आहे". नवऱ्यानी बॉम्ब टाकला. 

"अरे मी पुणेरी आहे, मला बाहेर कुठेही जायचं नाहीये हे तुला माहित नाहीये का?" माझ्या डोळ्यात पाणी. 

"हे बघ, दोन वर्षांसाठी तुम्ही तिघेही या. मग परत येऊ. मुलं लहान आहेत, त्यांच्या शाळा बदलल्यानी सध्या विशेष फरक पडणार नाही. प्लीज अरुणा. मलाही बोट सोडायची आहे ना. आणि तुम्ही सुट्ट्यांना इकडे येत जा ना." विजयचे आश्वासक भाष्य!. 

मग मी बोट सोडण्यासाठी आम्ही आधी केलेले विविध धंद्यांचे प्लॅन्स, माझी बेकरी मुलांची इथल्या शाळेतील कामगिरी वगैरे वगैरेची त्याच्याकडे दहादा उजळणी केली. मग त्याला ऑफिसमध्ये काम करण्याचा अनुभव घ्यायचा  आहे हे लक्षात आल्यावर कशी बशी मनाची तयारी केली. घर जुजबीच आवरलं. दोन वर्षांचा तर प्रश्न. 

 

१४ एप्रिल १९९१ रोजी आम्हा तिघांचे हाँग काँग मध्ये आगमन झाले आणि माझ्या हातात HSBC चे एक क्रेडिट कार्ड थोपवून १५ एप्रिलला नवरोजी दोन महिन्यांसाठी पोलंडला रवाना झाले. नवी जागा भाड्यानी घेतलेली. गॅस कनेक्शन नाही, ब्रिटिशांच्या हाँग काँग मध्ये ईस्टरची ९ दिवस सुट्टी. मुलांच्या शाळांचे काय करायचे हे माहित नाही. घरात मॅगी नूडल आणि अंडी याशिवाय काही नाही. मग काही तरी खायला करता यावे म्हणून जस्को स्टोअरमध्ये जाऊन एक मायक्रोवेव्ह आणला. तर त्याच्या सूचना जपानी आणि चिनी भाषेत! मदत हवी म्हणून शेजाऱ्याची बेल वाजवली आणि हे वाचशील का विचारलं. तो बापडा इंग्लिश बोलणारा निघाला आणि त्याच्यावर त्या दिवसापासून एका विस्थापित भारतीय कुटुंबाची जबाबदारी कोसळली. त्यांनी मायक्रोवेव्ह जोडून त्यात नूडल्स करून दिल्या, 

 

आमच्या वयाचा दिसला म्हणून त्याला म्हणाले, "बापू, माझी दोन मुलं (पुण्यनगरीसारख्या अफलातून शहरातून उचकटून आणलेली बापडी) गेले दोन दिवस आईच्या जाचाला कंटाळली आहेत. तुझ्याकडे आहेत का  थोडं फार इंग्लिश बोलणारी पात्रं? तो म्हणाला, "आहेत ना. चांगली इंग्लिश बोलतात. मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा. पण थोडासा प्रॉब्लेम आहे. मुलगी ३५ वर्षांची आणि मुलगा ३० वर्षांचा आहे." बापू रिटायर होऊन ४ वर्षे झालेली होती. 

त्याच्या सहानुभूतीचा पुरेपूर फायदा घेऊन, नवीन देश म्हणून ज्या ज्या अडचणी येतील त्या त्याच्याकडे ओकल्या. दुसऱ्या दिवसापासून बाटलीतील दुधाचा आणि साऊथ चायना मॉर्निंग पोस्टचा रतीब सुरु झाला. भाजी आणि घरगुती सामानाच्या मार्केटला जाणारा मागचा रस्ता समजला, जस्कोतून पुढे गेल्यावर सिटी प्लाझा नावाचा मोठ्ठा मॉल आहे हे समजले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या भागातली बहुतेक परदेशी मुले क्वारी बे नावाच्या ब्रिटिश शाळेत जातात हे समजले आणि शाळेचा नंबर मिळाला. 

 

ईस्टरची सुट्टी संपल्यावर शाळेत गेलो. शाळेचे स्टोअर एक भारतीय पालक चालवत असे. सुदैवाने ऑफिसमध्ये फॉर्म आणायला गेले तिथेच त्या अचानक भेटल्या. आम्ही मराठीत बोलतोय असं ऐकून "माझं नाव इज्जत दोसानी. तुम्ही इथे नवीन दिसता." असं विचारल्यावर आम्ही थक्क. "मी मुंबईची. इथे गेली आठ वर्षं आहे." हिनी यानंतर आमचा ताबा घेतला. भारतीय दुकाने दाखवण्यापासून ते अगदी जरुरी फर्निचर घेण्यापर्यंत सगळी मदत स्वतःची जबाबदारी असल्यासारखी या बाईंनी का केली हा एक प्रश्नच आहे. त्यांची एक मुलगी होती. तिनी आपल्या मित्र मैत्रिणींशी ओळखी करून दिल्या. यांचे कधीचे तरी जुने लागेबांधे असावेत. 

 

या पहिल्याच दोन अनुभवांमुळे हाँग काँग ही एक अतिशय आपुलकीने बहरलेली आणि परदेशवासियांना सहज स्वीकारणारी, सुखसोयीनीं युक्त अशी एक नगरी आहे अशी एक कल्पना झाली. शाळा सुरु झाल्यावर तर काय, पोरे खुश. "आई, इथे होमवर्क किती कमी आहे! आणि कधीही वर्गात परीक्षा घेतात. सांगतच नाहीत. म्हणजे परीक्षेसाठी अभ्यासाचं नाही." सेंट जोसेफची दुसरीची परीक्षा नुकतीच देऊन आलेली लेक म्हणाली. पुण्याच्या मैत्रिणींना पत्रातही इथल्या शाळेच्या सुरस आणि चमत्कारिक कथा लिहिल्या गेल्या. अठरा मेला लेकीचा वाढदिवस आम्ही वर्षानुवर्षे इथेच वास्तव्य असल्यासारखा मित्र मैत्रिणींसह साजरा केला. 

 

अशा तऱ्हेने एक चायनीज आणि एका भारतीयाने आम्हाला पंधरा दिवसात हाँग काँगमध्ये नव्याचे जुने केले. विविध तऱ्हेच्या दळण वळणाच्या साधनांनी हे छोटे शहर हातात आल्यासारखे वाटले. आणि आजूबाजूच्या टेकड्यांनी पर्वती, तळजाई यांची जागा घेतली. 

 

तिकडे पोलंडमध्ये विजयच्या मनात दुसरे काहीतरी शिजत होते. विजयला हे नवीन काम आवडले नव्हते. विजयची कंपनी शिप मॅनॅजमेन्टची. ज्याच्या जागी विजय ऑफिसमध्ये आला होता तो आता बोटीच्या मालकांच्या नोकरीत होता. दुर्दैवाने विजय ज्या बोटीचे काम पाहत होता त्याच बोटीचे काम तो आधी मॅनॅजमेन्टच्या बाजूने पाहत असे. त्याला मॅनॅजमेन्टचे कमिशन कुठे आहे, पैसे कुठे वाचतात याची खडा  खडा माहिती होती. तो केलेल्या कामात मालकाच्या बाजूने खोडी काढत होता. त्याचबरोबर कॅप्टन असताना हातात जी सत्ता असते ती  विजयला जुनिअर सुपरिंटेंडंटच्या पदावर मिळत नव्हती. आणि आम्ही नाहीतरी हाँग काँगला यायला तयार नव्हतोच. असे सगळे विचार करून विजयने वॉरसॉ एरपोर्टवर बसून राजीनामा पत्र तयार केले. 

 

आम्ही त्याला काय ताक एअरपोर्टला घ्यायला गेलो. मुले रस्ताभर परिकथेतील शहराचे वर्णन करत राहिली. घरी येऊन बघतो तर घर त्याच्या स्वागताला सुसज्ज होते. मुलांचे खेळ, लायब्ररीतली पुस्तके, बाल्कनीतली झाडे यांनीही  त्याला बरेच काही सांगितले. आता, राजीनाम्याचे पत्र फाडून त्यानी इथेच वसण्यासाठी मनाची तयारी केली.  आम्हाला पुढची कित्येक वर्षे याबाबत कळूही न देता! 

 

एकंदरीत आम्हाला हॉंगकॉंग आवडू लागले होते. हाँगकाँगच्या टेकड्यांवर सरकारने वाटांचे जाळे विणले आहे. कावलून हा भाग सोडला तर कुठल्याही भागातून चालत १०/१५ मिनिटात आपण टेकडीवरच्या एखाद्या वाटेवर पोहोचू शकतो. विजय जरी आमच्याबरोबर नसला मुलांना घेऊन टेकड्यांवर फिरणे सहज शक्य होते. आमचा शनिवार रविवार वेगवेगळ्या भागातील वाटांवर जायचा. विजय असला की शुक्रवार पासून पुढच्या रात्री शिपिंग समुदायाच्या मेजवान्यांमध्ये जात असत. तिथे खाण्यापिण्याची रेलचेल असे. रेस्टोरंटमध्येही मिळणार नाहीत असे नवे नवे पदार्थ शिजत असत. इतक्या काळजीने, इतके कष्ट घेऊन शिजवलेले चविष्ट अन्न अतिशय प्रेमाने खाऊ घातले जायचे. मला याचे फार कौतुक वाटत असे. 

 

मधुचंद्राचे दिवस संपले तसे तसे आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होऊ लागली. हाँग काँग ही ब्रिटिशांची कॉलनी असल्यामुळे सर्व सवलती परदेशी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. जास्त पगार तर आहेच पण त्याउपर घरभाडे, मुलांची महागडी इंटरनॅशनल शाळेची फी, सुट्टीत घरी जाण्यासाठी प्रवास खर्च या सगळ्या सवलती बहुतेकांना मिळतात. तुमच्या शेजारी बसणारा स्थानिक चिनी हा आपण करतो तेच काम करतो पण त्याला तुमच्याहून खूप कमी पगार मिळतो. स्थानिक लोकसंख्येच्या मानाने सरकारी घरे अतिशय कमी आहेत. या शहरात मध्यमवर्गीय स्थानिक माणसाला खाजगी मालकीच्या घराचे भाडे परवडणे शक्य नाही. इथली तीन विद्यापीठे स्थानिक विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गरज भागवू शकत नाहीत. इ. इ. 

 

१९७० पर्यंत अत्यंत कमी उत्पन्न असलेल्या आणि निकृष्ट दर्जाचे  राहणीमान असलेल्या स्थानिकामध्ये सध्या जे त्या मानाने बरे उत्पन्न मिळत होते, त्याची तक्रार करावी अशी भावना आणि आत्मविश्वास अजून निर्माण व्हायचा होता. अतिशय श्रीमंत चायनीजही त्यांचे शोषण करत होतेच. आमच्या हे लक्षात यायला लागले कि आम्ही सगळी परदेशी मंडळी समृद्धीच्या एका मोठ्ठ्या बुडबुड्यात राहत आहोत. 

 

माझ्या काही बहिणी, मैत्रिणी देशाबाहेर राहत होत्या पण खूपश्या इंग्लिश ही मुख्य भाषा असणाऱ्या देशात होत्या. त्या भारतीय, आणि मुख्यत्वेकरून मराठी मित्रमंडळींवर भिस्त ठेऊन असत. तरीही बाकीच्या समाजाशी, त्या समाजाच्या मूल्यांशी त्यांचा रोजचा संबंध येत असे. त्यांच्या स्थानिक शेजाऱ्यांशी त्यांचे हाय हॅलो म्हणण्यापलीकडचे संबंध असायचे. आखाती  प्रदेशात ज्या मैत्रिणी होत्या त्या फक्त भारतीय मंडळींना धरून असत आणि बाकी समाजाशी त्यांचा त्याच्यावर टीका करणे यापलीकडे संबंध नसे. तसे काहीसे आमचे हाँग काँग मध्ये असे. सांगायचा  हेतू हा की आम्ही कधीही हाँग काँगच्या समाजाशी संबंध ठेवायचा काडीइतकाही प्रयत्नही केला नाही. १९९७ च्या आधी बहुतेकांनी चिनी भाषा शिकायचाही प्रयत्न केलेला आढळला नाही.  

 

लिफ्टमध्ये आणि मजल्यांवर चायनीज खाण्याचे वास भरलेले असत. त्याबद्दल बहुतेक भारतीयांची तक्रार असे. मात्र  भारतीय जेवणाचा वास आवडत नसल्याने व भारतीयांत एकंदरीत साफसफाईचा अभाव असल्यामुळे काही चिनी घरमालकांनी भाड्याने घर द्यायचे नाकारले तर मात्र भारतीयांवरच्या अन्यायाची भाषा ऐकायला मिळत असे. 

 

मेट्रो (MTR) मध्ये, बसमध्ये भारतीयांजवळची, त्यातल्या त्यात कामगारवर्गातील भारतीयांजवळ सीट रिकामी दिसत असे. आम्हालाही क्वचित हा अनुभव आला. दुकानात गेल्यावर भारतीय गिऱ्हाईकांकडे दुर्लक्ष होणे ही नेहमीची बाब होती. फर्निचरच्या दुकानांमध्ये दुकानदाराने आपल्या मागे शंकेखोरपणे फिरणे याचा राग येत असे. गोऱ्या कातडीला त्यांच्या राज्यकर्तेपणामुळे, आणि त्यांच्या जास्त खर्च करण्याच्या क्षमतेमुळे दुकानांत, हॉटेल्समध्ये आणि सर्वसाधारण सर्वच जागी आपल्याला वैताग येईल असा मान असायचा. 

 

आमचे आयुष्य शिपिंग समुदाय, त्यांची कुटुंबे, माझ्या कामावरील मैत्रिणी, मुलांचे मित्र मैत्रिणी, त्यांच्या शाळा, त्यांना हिंदी मराठी शिकवणे यांत अगदी व्यस्त होते. इकडे तिकडे बघायलाही वेळ नव्हता पण तरीही घरची ओढ वाटायची. 

विजयने बोटीवरचे काम सोडले असले तरी त्याला कामासाठी खूप प्रवास करावा लागे. मी सुरवातीला हाँग काँग युनिव्हर्सिटीच्या मायक्रोबायॉलॉजी विभागात काम सुरु केले होते. मला घरी यायला संद्याकाळी साडेसात वाजत. माझी आई नऊ महिने मजा म्हणून आमच्याकडे येऊन राहिली होती. ती होती तोवर मुले शाळेतून आल्यावर ती असे पण ती परत गेल्यावर ते जमेना. घरी बसणे स्वभावात नव्हते. त्यामुळे, मुलांच्या शाळेत विशेष गरज असलेल्या मुलांसाठी (Special Needs) काम सुरु केले. 

 

मला काही वैयक्तिक कारणामुळे गुन्हेगारीशास्त्रात खूप रस होता. मी त्या दृष्टीने विचार सुरु केला. माझी शाळेतली वरिष्ठ सॅन्ड्रा टेलर हिने मला हाताशी धरले आणि विद्यापीठात प्रवेश घेण्याबद्दल मार्गदर्शन केले. माझी मूळ पदवी शास्त्रातील असल्यामुळे आणि कामाचा काहीच अनुभव नसल्यामुळे, मला तीन वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर यायला सांगितले. तो अनुभव घेतल्यानंतर, गुन्हेगारी शास्त्रामध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा केल्यावर आणि प्रवेश परीक्षेत विशेष योग्यता मिळाल्यावर विद्यापीठात प्रवेश मिळाला. 

 

आमच्या समाजशास्त्र विभागात गुन्हेगारी शास्त्र हा एक वेगळा उपविभाग आहे. माझा डॉ बोर्गे बाकन नावाचा नॉर्वेजियन प्राध्यापक हा नॉर्वेच्या सरकारला चीनच्या बाबतीतला सल्लागार होता. तो अस्खलित मँडरीन बोलत असे व त्याने मँडरीन भाषेत पुस्तकेही लिहिली होती. हार्वर्ड, बेजिंग अशा विद्यापीठांमधून शिकवून तो इथे आला होता. या क्षेत्रातला बाप माणूस. त्याने मला वेळोवेळी मदत केली आणि PhD करायला उद्युक्त केले. घरच्या काही अडचणींच्या वेळी मला शिक्षण सोडायला लागेल अशी वेळ आलेली असताना त्याने मला अमेरिकेतील यू पेन आणि  कोलंबिया विद्यापीठांमध्ये दोन दोन सत्र शिकण्याची सोय केली. 

 

आमच्या वर्गातले नव्वद टक्के विद्यार्थी पोलीस मधले होते. त्याचे कारण म्हणजे, हाँग काँग सरकारने लंडनच्या बॉबीच्या धर्तीवर, पोलीस हा तुमच्या मदतीला धावणारा मित्र असतो ही भावना जोपासण्याच्या हेतूने बरेच प्रयत्न सुरु केले होते. त्यामधील एक म्हणजे पोलिसांच्या गणवेशाचा हिरवा, सैन्याचा रंग बदलून तो निळा केला. दुसरा म्हणजे गुन्हेगारी शास्त्रामध्ये पदवी घेतल्यास पोलिसांना बढतीच्या मार्गात काही गुण देण्यास सुरुवात केली. गुन्हेगारीची सामाजिक व मानसिक कारणे या अभ्यासक्रमात समजावली जात असे. त्यामुळे गुन्हेगारांकडे बघण्याचा  दृष्टीकोन सहानुभूतीपर असल्यास, आणि त्यांच्याशी असणारी वागणूक सभ्य असल्यास; गुन्ह्याची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यांना समाजात पुनः पदार्पण करण्यासाठी लागणारी आत्मप्रतिष्ठा वाढते हे पोलिसांना माहित करून देणे हा त्यामागचा हेतू. बाकीचे विद्यार्थी वकील होते. विविध समाजशास्त्रींच्या विचारधारा, विविध देशांच्या न्यायव्यवस्था आणि त्यामागील भूमिका समजून हे पोलीसांच्या कामासाठी फार महत्वाचे आहे हे सरकारच्या लक्षात आले होते. बाहेर देशातील प्राध्यापकांमुळे, एक प्रकारचा जागतिक दृष्टिकोन विद्यापीठात दिसत असे. मी जवळ जवळ अकरा वर्षे वेगवेगळे विषय विद्यापीठात शिकल्यामुळे आणि जोडीला डॉ. बाकननी दिलेली विद्यापीठातील अंतर्गत माहिती यामुळे विद्यापीठाची ही विशेषता १९९७ नंतर हळू हळू कशी कमी होत गेली याची मी साक्षी होते. 

 

१९९७ सालच्या आधी आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये कुठलीही चायनीज भाषा शिकवण्याची सक्ती नव्हती. माध्यमिक शाळेत मँडरीन (चीनची अधिकृत भाषा) निवडता येत असे. पण बहुतेक मुले फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश अशा भाषा निवडत. स्थानिक लोकांशी संबंध आला नाही तरी बिघडत नसे. रस्त्यावर आणि स्थानिक बाजारांत बहुतेक स्थानिक लोकांना इंग्लिश येत नसल्याने आपली कशी गैरसोय होते याची उलट टिमकीच वाजत असे. आमचेही असेच. मुले ब्रिटिश शाळेत, माझी नोकरी त्याच शाळेत आणि विजय नॉर्वेजियन कंपनीत असल्यामुळे नुसत्या इंग्लिशवर भागात असे. मात्र मराठी बोलायला मन सारखे लालसत असे.  

 

१९९२ च्या मे महिन्यात महाराष्ट्र मंडळाशी ओळख झाली आणि आमचे हाँग काँग मधील आयुष्य बदलून गेले. घरच्या ओढीऐवजी मंडळ पुढचा कुठला सण साजरा करतंय याची ओढ लागू लागली. वयानी आणि हाँग काँगच्या अनुभवांनी मोठी असलेली मंडळी मंडळ चालवत असत. मोठे गायक, नट आले की परांडकरांच्या घरी कार्यक्रम होत असे. पाटील काका, काकी, प्रसाद कार्यक्रम बसवत, प्रॅक्टिस करून घेत आणि खाऊही घालत. पुढच्या काही वर्षातच नवीन रक्त पुढे येऊ लागले. प्रॅक्टिसची जागा सरदेसाईंकडे हलली. १९९७ पासून मंडळाची सभासद संख्या वाढत वाढत जाऊन इसवी २००० पर्यंत (Y 2 K मुळे) दोनशे वर गेली. कार्यक्रम भरगच्च होऊ लागले. 

 

मुलांचे मराठी भाषेत बोलणे आणि त्यांचे उच्चार चांगले राहणे यांचे श्रेय पुलंच्या ध्वनिफिती आणि मंडळ यांना  द्यायला हवे. तीन पैशाचा तमाशा, तुझे आहे तुजपाशी, सूर्याची पिल्ले...एक ना दोन कितीतरी नाटके, संगीताचे कार्यक्रम, साजरे केलेले सण, सहली, तंबूतील आणि सरकारी वसतीगृहांमधील शिबिरे अशांसारख्या इतक्या वैशिष्ट्यपूर्ण आठवणी मंडळानी दिल्या आहेत कि ज्यांनी भारतात आणि भारताबाहेर मंडळांची संकल्पना मांडली आणि ज्यांनी ज्यांनी दशकामागून दशके ती चांगल्या रितीने चालवली त्यांचे आमच्या वैयक्तिक विकासासाठी आणि संस्कृती संवर्धनासाठी कितीही आभार मानले तरी थोडेच. 

 

- अरुणा साठे -सोमण

 

पुढील भागासाठी........